अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. यातच वाढती रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे.
यातच नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यामुळे प्रशासन आता ऍक्शन मोडवर आले आहे. तालुक्यात यापुढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील कोरोना चाचणी केलेल्या व्यक्तींना त्यांचा कोरोना रिपोर्ट येईपर्यंत गृहविलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे.
स्वॅब दिलेल्या व्यक्तींना गृहविलगीकरण अथवा संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याची जबाबदारी तालुक्यातील तलाठी यांच्यावर आहे. त्यानुसार प्रत्येक तलाठ्याने आपल्या कार्यक्षेत्रात आरटीपीसीआर स्वॅब दिलेल्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवावे. स्वॅब दिलेली व्यक्ती इतरत्र आढळून येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
संबंधित व्यक्ती इतरत्र कुठेही आढळून आल्यास त्या गावच्या तलाठ्याविरोधात कारवाई होणार आहे. तसेच संगमनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. त्यानुसार आता कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती घरीच राहून कोरोनाचे उपचार घेणार नाही.
ज्या गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणात आढळून येतील तेथील ग्रामसेवकावर कारवाई होणार आहे. याबाबत संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी आदेश काढले आहेत.
त्या दृष्टीने तलाठी आणि ग्रामसेवकांना अंमलबजावणी करावी लागणार आहे. अन्यथा त्यांच्यावरच कारवाई होणार आहे. तहसीलदार निकम यांनी आदेश काढले आहेत.