Ahmednagar News : चोरीच्या दुचाकीची सैन्यदल परिसरात विकायचा, मिलेट्री इन्टेलिजेन्सने नगरमध्ये केली मोठी कारवाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये सैन्यदल परिसरात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला दक्षिण कमान मिलेट्री इंटेलिजेन्स, पुणे व कोतवाली पोलीस यांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले.

दिलीप दत्तात्रय शिंदे (रा. गोंधळे मळा, नागरदेवळे ता. नगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.

शिंदे याने सदरची दुचाकी शनिवारी (दि. ३) येथील क्लोरा ब्रुस मैदानावर झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याच्या पार्किंगमधून चोरी केल्याची कबुली दिली आहे.

सैन्यदल परिसरात एक इसम चोरीची बुलेट दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्स, पुणे

यांना मिळाली होती. त्यांनी कोतवाली पोलिसांना सदरची माहिती दिली. कोतवाली पोलिसांनी दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्स, पुणे पथकाला सोबत घेऊन नगर कॅम्प (सैन्यदल) परिसरात शोध घेतला असता त्यांना विना नंबर बुलेट दुचाकीसह एक संशयित तरूण मिळून आला.

त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने क्लोरा ब्रुस येथील मैदानातून दुचाकी चोरी केली असून ती विक्री करण्यासाठी आलो असल्याची माहिती पोलिसांना दिली.

त्याच्याकडील दुचाकी हस्तगत करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली आहे. शिंदे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात भिंगार कॅम्प, तोफखाना, शिरूर (जि. पुणे) येथील पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे तीन गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘असा’ आला जाळ्यात

शिंदे याने नगर शहरातून दुचाकीची चोरी केली. ती दुचाकी विक्री करण्यासाठी सैन्यदल परिसरात गेला. सदरची दुचाकी माझीच असून मला पैशाची गरज असल्याने दुचाकीची विक्री करायची आहे,

अशी माहिती त्याने एका सैनिकाला दिली. मात्र याची खबर दक्षिण कमान मिलेट्री इन्टेलिजेन्सला मिळताच शिंदे पकडला गेला.

त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office