Ahmednagar News : सफरचंद तशी आता वर्षभर मिळतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मात्र हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या सफरचंदांची जुलै-ऑगस्ट दरम्यना प्रतीक्षा सुरु होते.
यावर्षी आता ही प्रतीक्षा संपली असून पुण्यातील तसेच अहमदनगरमधील घाऊक बाजारपेठेत या सफरचंदांची आवक वाढत असल्याचे चित्र आहे. दरही आवाक्यात आहेत.

अलीकडच्या काळात वर्षभर सफरचंद मिळतात. जगाच्या कानाकोपर्यातून शहरात येत असतात. मात्र, हे सफरचंद महाग असतात.
आता हिमाचल प्रदेशातील सफरचंदाचा हंगाम सुरू झाल्याने खवय्यांची पाऊले देशी सफरचंदाच्या खरेदीकडे वळू लागली आहेत. बाजारात हिमाचली सफरचंदांची आवकही वाढू लागल्याने त्यांचे भावही आवाक्यात येऊ लागले आहेत.
घाऊक बाजारात पेटीला सरासरी चार हजार दर
सध्या किरकोळ एक किलो सफरचंदाची २०० ते २५० रुपये या दराने विक्री सुरू असल्याचे सांगण्यात आले. पावसाळा हा भारतीय सफरचंदाचा मुख्य हंगाम असतो. घाऊक बाजारात एका पेटीला सरासरी चार हजार रुपये भाव मिळाला.
सर्व सफरचंदांच्या दरात १५ ते २० टक्क्यांनी घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. हिमाचल प्रदेशातील शिमला, पराला, कोटखाई, रोडू, डल्ली, सोलन, नारखंडा, कुल्लू, मनाली, रामपूर येथून पहिल्या टप्प्यात आवक होत आहे.
सफरचंदाचे दर का वाढतात?
बाजारात वॉश्गिंटन, अर्जेंटिना, चिली, इराण, इटली, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका येथून वर्षभर परदेशी सफरचंदाची आवक होते. दरम्यान ते शीतगृहात साठवले जातात.
कोल्डस्टोरेजमधील ही सफरचंदे मागणीनुसार बाजारात पाठवली जातात. वाहतूक खर्च आणि साठवणूक खर्च भरमसाठ होत असल्याने त्यांचे किरकोळ बाजारात येईपर्यंत किमती वाढत असतात.