Ahmednagar News : शाळकरी मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न फसला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : सायकलवरून शाळेत येणाऱ्या पियांश अमोल शेलार या अकरा वर्षीय इयत्ता सहावीच्या शाळकरी मुलाला तिघांनी मिळून नुकताच अपहरणाचा प्रयत्न केला. काल सोमवारी संबधीत तिघेही दुचाकीवरून बेलापूर येथुन राहुरीच्या दिशेने चालले होते. त्यावेळी हा मुलगा नर्सरीकडून सायकलवर केशव गोविंद विद्यालयात बेलापूर खुर्द येथे नेहमीप्रमाणे शाळेत येत होता.

त्याच्या जवळून पुढे गेल्यावर तो एकटाच आहे हे पाहून त्या तिघांनी पुन्हा मागे येऊन त्या मुलाला हात ओढुन त्याला एक फटका मारला आणि गाडीवर बसण्यासाठी दमबाजी करीत आपल्या गाडीवर बसविण्याचा प्रयत्न केला.

मात्र या मुलाने त्यांच्या हाताला हिसका देत आरडाओरड करुन पळ काढला. तेवढ्यात रविंद्र पुजारी यांनी त्या मुलाला रस्त्याच्या बाजूला रडताना पाहिले असता, हा प्रकार उघडकीस आला.

दरम्यान, त्या तिघांनी देवळालीच्या दिशेने पलायन केले आहे. या संदर्भात बेलापूर खुर्दचे प्रभारी सरपंच अॅड. दिपक बारहाते, शिक्षक प्रशांत होन यांच्या पुढाकाराने पालकांनी स्थानिक पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करीत आहे.

संबंधित गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम तात्काळ सुरु केले आहे. या घटनेबद्दल परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेमुळे पालकांनी सतर्क राहुन आपल्या पाल्याची काळजी घ्यावी, असे आवाहन अॅड. दिपक बारहाते यांनी केले आहे.