अहमदनगर बातम्या

पर्यावरण मारलं फाट्यावर…. एका झाडाची सरासरी किंमत ५९१ रुपये

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे अनेकांच्या अनेक कटू,गोड आठवणींचे साक्षीदार आहेत. ही झाडे अनेक गावांची ओळख आहेत. नगर-करमाळा या महामार्गाच्या कामामुळे हजारो झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे.

ही झाडे जमिनीवर कोसळत असताना अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पण त्यांनी खंत व्यक्त केली की आठवणींचे साक्षीदार संपले. विकास होतोय पण मनाला हुरहूर लागत आहे.

असे अनेक नागरिकांनी सांगितले. बहुप्रतिक्षित नगर-करमाळा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा असणारी मोठमोठी अनेक झाडे तोडली जात आहेत.

रस्तारुंदीकरण तसेच रस्त्याच्या अन्य कामांसाठी हजारो झाडे तोडण्यास वन विभागाने परवानगी दिली. ‘विकासासाठी ही झाडे तोडावी लागत आहेत. एका झाडाच्या मोबदल्यात दोन झाडे लावू’, असा युक्तिवाद विकासक करीत आहे.

शेकडो वर्षांच्या वृक्षाच्या मोबदल्यात दोन रोपटी किती ऱ्हास भरून काढणार आहेत? विकासाच्या नावाखाली झाडे तोडण्यास वन विभागाकडून परवानगी दिली जात असली,

तरी संबंधितांकडून पुन्हा वृक्षारोपण केल्यावर, लावलेली झाडे जगविली जातील का, याचा कोणताही लेखाजोखा ठेवण्याची तसदी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.

वृक्षतोडीनंतर संबंधितांकडून हमीपत्र लिहून घेऊन कागदपत्रांचे सोपस्कार तेवढे पार पाडले जातात. आधुनिकीकरणासाठी काही वृक्षतोड जरी अपरिहार्य असली, तरी याची भरपाई म्हणून लावलेली रोपटी जगविण्याची तसदी घेतली जाते का,

हेही पाहणे यंत्रणेचे काम आहे. त्याबाबत मात्र लपवाछपवी केली जात आहे. स्थानिक म्हणत आहेत की झाडे जास्त होती परंतु वनविभागाने कमी दाखवले आहेत.

एका झाडाची किंमत ५९१ रुपये :- नगर-सोलापूर महामार्गावर कर्जत तालुका हद्दीत 2 हजार 514 मोठे वृक्ष आहेत. त्यांतील काही जमीनदोस्त केली आहेत. त्या वृक्षांचे सरकारदप्तरी असलेले मूल्य अवघे 14 लक्ष 78 हजार आहे.

दप्तरी असलेल्या मूल्यांकनावरून एका झाडाचे सरासरी मूल्य ५९१ रुपये आहे. या मध्ये लहान झाडाची गिनती किती याबद्दल कोणताही ठोस आकडा नाही.

पर्यावरणाचे किती मोठे नुकसान झाले, हे निसर्गच सांगू शकेल. पन्नास वर्षे जुन्या झाडाच्या मोबदल्यात फक्त दोन लहान रोपटी लावण्याची तरतूद असल्याचे समजते.

Ahmednagarlive24 Office