भाजपचे हे नेते म्हणाले नगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढाळसली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील आघाडी सरकार हे केंद्राच्या योजनांचे श्रेय घेण्याचेच काम करत आहे, अशी टीका भाजपचे संघटनमंत्री रवी अनस्पुरे यांनी गुरुवारी केली. भाजपची जिल्हास्तरीय बैठक अनासपुरे यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी ते बोलत होते. पत्रकार अर्णव गोस्वामींच्या अटकेचा यावेळी निषेध करण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा प्रभारी लक्ष्मण सावजी, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य भानुदास बेरड यावेळी उपस्थित होते.

अनासपुरे म्हणाले, केंद्र सरकारच्या योजनांची माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाभार्थींपर्यंत पोहोचवण्यासाठी संपर्क वाढवला पाहिजे. प्रत्येक आघाडी, मंडळाची स्वतंत्र बैठक घेऊन सर्वांशी संपर्कात राहिले पाहिजे. नगरमध्ये पदाधिकारी चांगले काम करत आहेत.

पुढील काळात हे काम आणखी चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. अर्णव गोस्वामी यांना चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेऊन आघाडी सरकारने मोठी चूक केली. मीडियाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे. या विरोधात आम्ही आवाज उठवून सत्य बाहेर काढू, असे अनासपुरे यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले, नगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढाळसली आहे. दुधाचा प्रश्न, अतिवृष्टी, रस्ते, तसेच मंदिरप्रश्नी प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु प्रशासन कोणत्याही प्रकारे दखल घेत नाही.

आता भाजप कार्यकर्ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सूत्रसंचालन प्रसाद ढोकरीकर यांनी केले, तर आभार श्याम पिंपळे यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24