Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील विद्युत सबस्टेशन परिसरात अंदाजे ४५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. काल रविवारी (दि. ११) वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तळेगाव दिघे गावानजीक असलेल्या विद्युत सबस्टेशन परिसरात श्रीरंग रेवजी दिघे यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात पुरुषाचा मृतदेह काल रविवारी आढळून आला. सदर इस्माने केवळ अंडरवेअर परिधान केलेली होती.
नजीकच त्याची पॅन्ट आणि शर्ट आढळून आला. याबाबत पोलीस पाटील दत्तू इल्हे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला.
याप्रसंगी युवक कार्यकर्ते स्वप्नील दिघे, सार्थक कांदळकर, श्रीपाद दिघे यांनी पोलिसांना सहाय्य केले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर व्यक्ती कोण, कुठली? याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.