Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून बेपत्ता असलेल्या एकाचा कहांडळवाडी (ता. सिन्नर) शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय ३६), असे मयताचे नाव आहे. बुधवारी (दि.३) एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत इसमाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या टाकून झाकून ठेवलेला होता. मात्र दुर्गंधी सुटल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी शिवारातील गट क्रमांक १४१ मधील शेतात सदर इसमाचा मृतदेह नुकताच आढळून आला. वाळलेल्या फांद्या टाकून मृतदेह लपवून ठेवण्यात आलेला होता. बुधवारी (दि.३) सकाळी गावातील व्यक्ती सदर परिसरात गेली असता त्याला दुर्गंधी येऊ लागली.
त्याने पाहणी केली असता नजीकच लिंबाच्या झाडाच्या फांद्यांच्या खाली दाबलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. त्यानंतर कुजलेला मृतदेह आढळून आल्याची चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर यांच्यासह पोलिसाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाजवळ काही वस्तू पोलिसांच्या आढळून आल्या.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर प्रकार घातपाताचा असल्याचा संशय पोलिसांना असून
सदर इसमाचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर अधिक तपास करीत आहेत. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.