Ahmednagar News : बोधेगाव तालुक्यातील हातगाव येथून गायब झालेल्या नागेश बंडू गलांडे (वय २४) याचा मृतदेह शुक्रवारी (३ मे) दुपारी एक वाजेच्या सुमारास जायकवाडीच्या उजव्या कालव्यात हातगाव शिवारात आढळून आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, हातगाव येथील नागेश बंडू गलांडे हा गुरुवारी (२ मे) सकाळी साडेसात वाजता घरातून निघून गेला होता. याबाबत त्याचे मामा शिवाजी तुकाराम घोलप यांनी शेवगाव पोलिसांनी खबर दिली होती.
ग्रामस्थ व नातेवाईकांनी इतरत्र त्याचा शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. दरम्यान, त्याची मोटारसायकल हातगाव शिवारातील जायकवाडी जलाशयालगत ग्रामस्थांना आढळून आली होती.
शुक्रवारी (३ मे) दुपारी एक वाजेदरम्यान नागेश गलांडे याचा मृत्यदेह कालव्यातील पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिस हवालदार नानासाहेब गर्जे यांनी घटनास्थळी येऊन ग्रामस्थांच्या मदतीने कालव्यातून नागेशचा मृतदेह बाहेर काढला. उत्तरिय तपासणीसाठी त्याचा मृतदेह शेवगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला होता.
शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, नागेश याच्या मृत्यूचे नेमके कारण समजले नाही.
पाच दिवसांपूर्वीच झाला होता नागेशचा विवाह
कालव्यात मृतदेह आढलेल्या नागेश याचे ५ दिवसांपूर्वीच २८ तारखेला थाटामाटात लग्न झाले होते. अंगाची हळद फिटत नाही, तोच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
आई-वडिलांना तो एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे हातगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.