अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2021 :- नगर शहरातील भवानीनगरमध्ये चक्क मुलाचा हुंड्यासाठी छळ केल्याची घटना घडली असून या प्रकाराला कंटाळून मुलाने विषारी औषध प्राशान केले, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान याप्रकरणी चव्हाण कुटुंब कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली.
न्याय मिळण्यासाठी चव्हाण कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षणच्या मैदानात अमरण उपोषण सुरू केले आहे.
भवानीनगर येथील पारधी समाजातील धनेश चव्हाण व त्याची पत्नी पूजा चव्हाण यांचा 7 जानेवारी 2021 रोजी विवाह झाला होता. पारधी समाजाच्या रुढी परंपरा नुसार मुलाने मुलीच्या कडील व्यक्तींना हुंडा द्यायचा असतो.
तीन लाख रूपये देणे ठरले होते. त्यापैकी 50 हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरवले होते. परंतु मुलीकडच्यांनी आमच्या मुलास सारखा पैशाचा तगादा लावला व त्याचा छळ केला.
या जाचाला कंटाळून धनेश यांने विषारी औषध घेतल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणाची सखोल चौकशी करून मुलीकडील व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चव्हाण कुटूंबाने केली आहे.