Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचा आरोप बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथ्था यांनी केला आहे.
या माध्यमातून बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त करून याला आळा घालण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ओळखपत्र पडताळणी यंत्रणा हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबत मुथ्था यांनी पत्रकारांना सांगितले, की निवडणूक आयोगाने पारदर्शी निवडणुका व्हाव्यात, या उदात्त हेतुने १२ ओळखपत्रांची यादी जाहीर केली. यापैकी कोणतेही एक ओळखपत्र मतदाराकडे असल्यास तो मतदान करू शकेल.
मात्र काही देश विघातक शक्तींकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस ओळखपत्रे तयार करून बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. याची खातरजमा करण्यासाठी मुथा यांनी काही प्रतिष्ठित व्यक्तींचे बोगस आधारकार्ड बनवून घेऊन हा प्रकार समोर आणला आहे.
यामुळे मतदान केंद्राच्या ठिकाणी या ओळखपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी यंत्रणा असणे आवश्यक असल्याचे अधोरेखीत झाले आहे. याशिवाय बोगस मतदान टाळणे अशक्य आहे. या बोगस ओळखपत्रांचा वापर करून एसटी महामंडळालाही दरवर्षी लाखो रुपयांचा चुना लावला जात असल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे असे बोगस ओळखपत्र वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांच्या मार्फत ओळखपत्र बनवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे सहज शक्य आहे. तरी निवडणूक आयोगाने ही बाब गांभीर्याने घेऊन त्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात, अशी मागणी मुथ्था यांनी केली आहे.