अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- शहरातील वाढत्या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मनपाच्या वतीने उपाययोजना राबवण्यात येत होत्या. मात्र आता या मोहिमेला राजकारणी खोडा घालत आहे.
एखादे मोकाट जनावर पकडले रे पकडले की जनावराच्या मालकाच्या आधी शिव्या खायच्या अन् नंतर त्याच्याशी संबंधित एखादा पदाधिकारी, लोकप्रतिनिधीची अरेरावी सहन करायची, असे प्रकार महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराच्या कर्मचार्यांना अनुभवास येत आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. वाहतुकीत अडथळे, वाहतूक कोंडी, अपघात अशा विविध कारणांनी मोकाट जनावरे नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे महापालिकेने शहरातील मोकाट जनावरे पकडून ते कोंडवाड्यात टाकण्याची मोहीम हाती घेतली.
यासाठी मनपाने टेंडर काढून खासगी संस्थेला काम देण्यात आले. महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदाराच्या कर्मचार्यांनी शहरात मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र या मोहिमेला अनेक अडथळे पार करावे लागले. या मोहिमेत जनावर पकडत असताना मालक लोकं लगेच तेथे येतात.
पथकातील कर्मचार्यांना शिवीगाळ करतात. त्यानंतर पदुहेरी मंडळी देखील जनावरे सोडून देण्यास सांगतात. कारवाईबाबत कर्मचारी पुढे काही बोलल्यास त्यास अरेरावीची भाषा सहन करावी लागते. याबाबत ठेकेदाराने महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप मनपाने तरी कोणतीही कारवाई केलेली नाही.