अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :- पारनेर तालुक्यातील कासारे (ता.पारनेर) येथील भिल्ल समाजातील प्रियंका शिवाजी पवार यांचा कोंबडी पालनाचा व्यवसाय आहे.
शेजारी राहणार्या व्यक्तींनी बुधवार दि.6 जानेवारी रोजी पूर्ववैमनस्यातून पिठाच्या गोळ्यात विष टाकून कोंबड्यांना मारले. सदर प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून घेतला जात नसल्याने, पीडित कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात सदर प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.
घराशेजारी राहणार्या मधुकर जनार्दन दातीर व मीराबाई मधुकर दातीर यांनी हा प्रकार केला असल्याचा प्रियंका पवार यांचा आरोप आहे. ही घटना कामावरुन आल्यानंतर उघडकीस आली.
सदर प्रकरणी शेजारी राहणार्या दातीर कुटुंबीयांना जाब विचारला असता त्यांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. तर जीवे मारण्याची धमकी दिली. या व्यक्तींकडून कुटुंबियांना धोका निर्माण झाला आहे.
कोंबड्या मारणार्या या व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यासाठी टाकळीढोकेश्वर पोलीस स्टेशनला गेले असता तेथे तक्रार घेण्यात आली नाही. पारनेर पोलीस स्टेशनला जाण्यास सांगण्यात आले.
पारनेर पोलीस स्टेशनला गेलो असता त्यांनी पण तक्रार न घेताच, तुम्ही तुमचे भांडण आपसात मिटून घ्या, नाहीतर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील असा सल्ला दिला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
यापूर्वी सन 2012 ला देखील सदर व्यक्ती विरोधात तक्रार नोंदवली असता, त्या तक्रारीवर अद्यापही काही कारवाई झाली नाही. यामुळे त्यांनी अशा पद्धतीने एक पाऊल पुढे जाऊन कोंबड्यांना विष देऊन मारले आहे.
सदर व्यक्तींवर योग्य कारवाई करून कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याची मागणी तक्रारदार प्रियंका पवार व पवार कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे.