अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-फुग्यांचे वेगवेगळे रंग बघून आणि खाऊ मिळाल्याने ही लहान मुले हरखून गेली होती. फुगे उडवताना त्यांची धम्माल चालली होती.
भान विसरून ही मुले फुगे उडवत होती. त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, उत्साह यामुळे सगळे वातावरणच चैतन्यमय झाले होते.
सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने स्नेहबंध फौंडेशनच्या वतीने गरीब मुलांसोबत पतंगाऐवजी फुगे उडवून व खाऊ वाटप करून संक्रात सण साजरा करण्यात आला.
स्नेहबंध फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी पतंगोत्सवासाठी धोकादायक चायना मांजा न वापरण्याचा संकल्प केला होता. स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले,
पतंगोत्सवात मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने प्रतिस्पर्ध्याची पतंग कटली की हा धारदार मांजा झाडे, तारा यांच्यावर अडकून पडतो. परिणामी या मांजात पक्षी अडकतात.
पतंगप्रेमींच्या अतिउत्साहामुळे पक्ष्यांवर संक्रांत येत आहे. प्रसंगी हा नायलॉनचा चीनी बनावटीचा पक्का मांजा रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना व पादचाऱ्यांना अपघातास कारणीभूत ठरत आहे.
परिणामी मांजाचे दुष्परिणाम लक्षात घेता संक्रात सणानिमित्त गरीब मुलांना फुगे देऊन खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी अभिजीत ढाकणे, हेमंत ढाकेफळकर, संकेत शेलार, सुधाकर बुरा आदी उपस्थित होते.