Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याने (कुकडी) शेतकऱ्यांचेही पैसे थकवले आहेत. ‘आरआरसी’चा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांची काही रक्कम अदा केली. तरीही १५ कोटी थकित होते.
शेतक-यांचे पूर्ण पैसे न दिल्याने कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन साखर, मोलॅसिस व इतर उत्पादनांची विक्री करून ही रक्कम वसूल करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी मागील महिन्यात दिले होते. त्यापाठोपाठ आता वीजबिलाच्या थकबाकीपोटी कारखान्याचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला आहे. कारखान्याकडे जवळपास ६० लाखांचे वीज बील थकित आहे.
एकीकडे माजी आ. राहुल जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या या कारखान्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तर दुसरीकडे आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढविण्याची त्यांची तयारी सुरू आहे. त्यासाठी लग्न, समारंभास हजर राहून संपर्क वाढविण्यावर त्यांचा भर आहे. त्यांचे समर्थक जगताप हेच उमेदवार समजून कामाला लागले आहेत.
२०१४ मध्ये त्यांनी तालुक्यातील भाजपचे नेते तथा विद्यमान आ. बबनराव पाचपुते यांचा पराभव केला होता. मात्र २०१९ मध्ये त्यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.
माजी आ. राहुल जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली असलेला कुकडी साखर कारखाना वादग्रस्त ठरत आहे. बागायती क्षेत्र मोठे असलेल्या तालुक्यातील मोठ्या क्षेत्रात ऊस असल्याने या कारखान्याची आर्थिक स्थिती पूर्वी मजबूत असायची. (स्व.) कुंडलिकराव जगताप यांनी मोठ्या संघर्षातून हा कारखाना उभारला आहे.
कारखाना उभारणीपासून ते हयात असेपर्यंत हा कारखाना उत्कृष्ठ कामासाठी ओळखला जात होता. कारखान्याकडे जवळपास ६० लाखांचे वीज बील थकित आहे. महावितरणने अनेकदा मागणी करूनही ते जमा केले जात नव्हते. अखेर महावितरणने कारखान्याचा वीजजोड तोडला. किमान दोन महिन्यांचे बील अदा करावे, असे महावितरणचे म्हणणे आहे.