अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- राज्यभर गाजलेल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची सुनावणी आज दि. 4 ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर करण्यात आलेली सुनावणी तहकूब ठेवण्यात आली आहे.
दरम्यान याबाबतची अधिक माहिती विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी दिली. सदर प्रकरण तांत्रिक कारणामुळे आपल्यासमोर चालविण्यास न्यायमूर्तींनी नकार दिला. त्यामुळे सदर प्रकरण आता दुसर्या न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग होणार आहे.
त्यानंतर सदर प्रकरणाची नियमित सुनावणी होण्याची शक्यता आहे असे यादव-पाटील म्हणाले. कोपर्डी येथे घडलेल्या बालिकेवरील बलात्कार आणि खून प्रकरणाच्या अनुषंगाने जिल्हा सत्र न्यायालय अहमदनगर यांनी या प्रकरणातील तीनही आरोपीना मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
या निर्णयाविरोधात आरोपींच्यावतीने उच्च न्यायालयात अपील करण्यात आलेले आहे. उच्च न्यायालयातील सुनावणी आता दृष्टीक्षेपात आल्यामुळे पीडित मुलीच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.