अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- किरकोळ भांडण याचा जाब विचारण्याच्या कारणावरुन झालेल्या जोरदार भांडणाचे पर्यावसान खुनात झाले होते.
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या तरुणाच्या या खूनप्रकरणी संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघा जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
गोविंद साळपाटील खेमनर, विशाल ऊर्फ छोटू हौशीराम खेमनर आणि संपत ऊर्फ प्रशांत शांताराम गागरे अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत.
भांडणाचा जाब विचारल्याच्या कारणातून संगमनेर तालुक्यातील अंभोरे शिवारामध्ये ८ मार्च २०१७ रोजी ही घटना घडली होती. यात स्वप्निल शिवाजी पुणेकर याच्यावर चाकूने वार करण्यात आल्याने तो मृत झाला होता.
तर विनायक साळबा पुणेकर, भाऊसाहेब पुणेकर आणि शिवाजी केरु पुणेकर हे जखमी झाले होते. नंतर जखमींच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश एस. वाय. भोसले यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर त्यांनी सोमवारी तिन्ही आरोपींना ही शिक्षा सुनावली आहे.