अहमदनगर बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट ; न्याय न मिळाल्यास दिला उपोषणाचा इशारा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : सरकारने प्रकल्प अभियान अंतर्गत अंतर्गत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर सोयाबीनचे बियाणे पुरवले आहे. मात्र या बोगस बियांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पेरणीनंतर आठ दिवस उलटले मात्र अद्याप देखील हे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. कृषी विभागाने तातडीने या गंभीर बाबीची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.

राज्य सरकार शेतकऱ्यांना पेरणी दरम्यान मदत व्हावी या हेतूने ५० टक्के सवलतीने विविध प्रकारचे बियाणे पुरवते. पिंपरी निर्मळ येथील शेतकरी बचत गटांना व वैयक्तिक अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून बियाणे पुरवठा करण्यात आला.

काही जातीचे बियाणे पेरणी केले. आठ दिवस उलटून गेले तरीही या बियाण्याची अद्याप उगवण झालेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार करून याबाबत चौकशीची मागणी केली आहे.

पेरणी करण्यासाठी शेती मशागत, पेरणी, बियाणे, खते ट्रॅक्टरची मजुरी असा मोठा खर्च शेतकऱ्यांचा यासाठी झालेला आहे. बियाणे बोगस आहे का, बियाणेची उगम क्षमता कमी आहे का? बियाणे भिजलेले होते का, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.

शासनाच्या व बीज कंपनीच्या या बेजबाबदारपणामुळे शेतकऱ्यांना मात्र मोठा भुर्दडं सोसावा लागत आहे. त्यामुळे कृषी विभागाने व संबंधित विभागाने तातडीने या बाबीची दखल घेऊन या गंभीर बाबीची चौकशी करावी तसेच या शेतकऱ्यांना तातडीने दुबार पेरणीसाठी आवश्यक ते बियाणे, खते व इतर यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

तसेच कृषी विभागाने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे. तालुका कृषी अधिकारी राहाता आबासाहेब भोरे, कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर यांचे शास्त्रज्ञ देशमुख, कृषी सहाय्यक जया निमसे, श्रीमती माघाडे व संबंधित अधिकाऱ्यांनी या प्लॉटची पाहणी केली असून सोमवारपर्यंत यावर योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन संबंधित शेतकऱ्यांना दिले.

Ahmednagarlive24 Office