अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-लोकांमध्ये करोना लसीकरणासंदर्भात सकारात्मक जागृती झाल्यानंतर लस घेण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. मात्र आता लसीकरणापूर्वी रॅपीट अॅन्टीजेन तपासणीची सक्ती करण्यात आली आहे.
मात्र या सक्तीमुळे आता नागरिकांनी देखील एक पाऊल मागे घेतले आहे. टेस्टच्या भीतीने लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी होऊ लागली आहे.
दरम्यान हे चित्र जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील सोनई लसीकरण केंद्रावर दिसून आले. लसीकरण केंद्रावर सकाळी लस घेण्यासाठी 200 हून अधिक ग्रामस्थ रांगेत उभे होते.
अॅन्टीजेन तपासणी करुनच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. रांगेतील पहिल्या 12 व्यक्तीपैकी सहा जण पॉझिटिव्ह निघाले आणि लगेचच अनेकांनी काढता पाय घेत घराचा रस्ता धरला.
शनिवारी एकूण 140 लस आल्या होत्या. मात्र अॅन्टीजेन तपासणीच्या नियमाने प्रथमच अनेक लस शिल्लक राहिल्याचा प्रसंग घडला.
वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कसबे यांनी कोरोना स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी अॅन्टीजेन तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले.
ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीनंतर गुरुवार पासून लसीकरण कामात विशेष काळजी घेवून काम केले जात आहे.