श्रीगोंद्यातील ‘कुकडी’चे आवर्तन साडेसहा दिवसांमध्येच गुंडाळले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : कुकडी प्रकल्पाच्या चालू आवर्तनात ‘टेल टू हेड’ धोरणात करमाळा, कर्जतमधील ओढे, नाले, तलावही भरले, पण श्रीगोंदे तालुक्यात केवळ साडेसहा दिवस कालवा सुरू राहिला. त्यात अनेक चाऱ्या कोरड्या राहिल्या.

मुख्य कालव्यापासून १५ ते १६ किमीवर चाऱ्या असताना काही ठिकाणी मुख्य कालव्यालगत ३ किमी अंतरावर पाणी मिळाले, इतर शेतकरी हवालदिल झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तरी पुरेसे पाणी मिळेल, असे शेतकऱ्यांना वाटत होते,

पण दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, मते कशी मागायची, हा प्रश्न गावातल्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत किमान ९ दिवस पाणी देण्याची मागणी केली होती, पण प्रत्यक्षात ६ दिवसांवर बोळवण करण्यात आली. आता आवर्तन कालावधी वाढवण्याची मागणी होत आहे, पण वरील भागाचे भरणे आणि पिण्याच्या पाण्याची मागणी पाहता,

ही मागणी पूर्ण होणे अवघड दिसत आहे. शेजारच्या तालुक्यात (कर्जत-जामखेड) पुरेसे पाणी मिळत असताना श्रीगोंदे तालुक्याला कायम सापत्न वागणूक मिळते. सल्लागार समितीत तालुक्यातील अनेक नेत्यांचा समावेश असतानाही, दरवेळी येथील शेतकऱ्यांवर अन्याय होतो.

अनेकदा पाणी उशिरा मिळून लवकर संपते. काही वेळा काही भाग पाण्यापासून वंचित राहतो. विसापूरचा समावेश प्रकल्पात नसल्याने त्याखालील क्षेत्र कायमच वंचित राहते. शिवाय ज्या भागाला पाणी मिळते, तेथे गेज कमी राहत असल्याने पूर्ण भरणे होण्याआधीच आवर्तनाचे वेळापत्रक दाखवून पाणी बंद केले जाते.

यात छोटे शेतकरी भरडले जातात, तर मोठे बागायतदार पैसे मोजून लाखो लिटर क्षमतेचे शेततळे भरून घेतात हेही वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. सध्याच्या आवर्तनात तालुक्यातील लाभक्षेत्रातील उभ्या पिकांना पाणी देण्याचे,

तसेच पिण्याच्या पाण्याचे उद्भव भरण्याचे ठरले होते, प्रत्यक्षात कालव्यालगत पाणी देऊन सुमारे ६० टक्के शेतकरी वंचित राहिल्याची तक्रार होत आहे. आता तर पाणी बंद झाले. राहिलेल्या क्षेत्राला पाणी देण्यासाठी येडगाव धरण पर्याय आहे, पण हा निर्णय होण्याची शक्यता दुर्मिळ आहे.

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

सध्या नेते मंडळी लोकसभा निवडणुकीचा प्रचारात दंग आहेत. पाणी न मिळाल्याने पिके व फळबागा जळून खाक झाल्याने शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज असून, या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्रा काही शेतकऱ्यांनी घेतला आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe