Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. एकीकडे पाणी आडवा पाणी जिरवा असे धोरण शासन राबवत आहे.
परंतु दुसरीकडे निकृष्ट कामामुळे बंधारा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडली आहे.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील करपरा नदीवरील बंधारा फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. दुशिंग वस्तीजवळील या बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले होते.
दोन्ही बाजू फक्त मातीने बुजविल्या होत्या. कमी दर्जाची वाळू, सिमेंट व स्टीलचा वापर झाला होता. उंबरेतील नागरिकांनी तक्रारी दिल्या,
मात्र ठेकेदाराने काम अर्धवट पूर्ण करून, तक्रारींना केराची टोपली दाखवित बिले मंजूर करून घेतली असा आरोप नागरिक करत आहेत.
शेतकऱ्यांची जीवनदायी म्हणून या बंधाऱ्याकडे पाहिले जाते. शेकडो हेक्टर जमीन बंधाऱ्यामुळे ओलिताखाली आली,
परंतु ऐन उन्हाळ्यात बंधारा फुटल्याने उभी पिके जळणार आहेत. लाखो रुपये खर्च करून शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी ओलिताखाली याव्या म्हणून नदीमध्ये बंधारे बांधले.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचा हा प्रयत्न, मात्र निकृष्ट कामामुळे हाणून पाडला जात आहे.
करपरा नदीवरील बंधारा निकृष्ट दर्जाचा बांधला. यामुळे तो फुटल्याने शेतकऱ्यांसमोर पाण्याचे संकट उभे राहिले आहे. मुळा पाटबंधारेतून उन्हाळी आवर्तन सोडले आहे.
उन्हाळी पिके बंधाऱ्यामुळे वाचणार होती, परंतु बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांना ‘दुष्काळात तेरावा महिना’ म्हणण्याची वेळ ओढवली आहे.
बंधारा तत्काळ दुरुस्त करावा. ठेकेदारावर कारवाई करून, नुकसान भरपाई घ्यावी, अशी मागणी होत आहे.