Ahmednagar News : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कुरकुटवाडी येथे २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात या युवकाचा मृत्यू झाला अथवा त्याला दुसरे काही कारण आहे, याचा तपास घारगाव पोलिस करत आहेत. सचिन भानुदास कुरकुटे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
कुरकुटवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले भानुदास कुरकुटे हे सध्या आळंदी (जि. पुणे) येथे रुग्णवाहिका चालक आहेत. त्यांच्या पत्नी संगीता, मुलगा सचिन आणि हरीश असे तिघे कुरकुटवाडी येथे राहत असताना सचिन व हरीश गुरुवारी रात्री घराच्या बाहेर पडवित झोपले होते.
संगीता कुरकुटे या घरात होत्या. रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सचिन कुरकुटे याच्यावर बिबट्याने हल्ला केला, असे त्याचा भाऊ हरीश कुरकुटे याने सांगितले. परिसरातील ग्रामस्थांना सांगितल्यानंतर जखमी झालेल्या सचिन कुरकुटे याला आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.मृतदेह आळे येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.
बिबट्याने हल्ला केल्याची माहिती वनविभाग आणि पोलिसांना समजल्यानंतर घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पोलिस उपनिरीक्षक उमेश पतंगे, पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, प्रमोद गाडेकर आदींसह वनविभागाचे वनपाल हारुण सय्यद, वनरक्षक श्रीकिसन सातपुते हे घटनास्थळी पोहोचले. बिबट्याने हल्ला केला, त्यात सचिन कुरकुटे याचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती समोर येत असताना शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशाने झाला. हे स्पष्ट होईल.
मृत्यूचे खरे कारण येणार समोर….
पोलिस आणि वनविभागाच्या अधिकायांनी घटनास्थळावरून वस्तुस्थितीजन्य पुराव्यांची जुळवाजुळव केली.
मयत तरुणाच्या गळ्याला झालेली एकमेव जखम बरीच खोल असल्याने, त्यातून जागेवरच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. पोलिस आणि वनविभागानेही सावध भूमिका घेत, शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सांगितले आहे.