अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुंकुद देशमुख व अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत नियंत्रण कक्षात हजर राहण्याचे आदेश काढले आहेत.
दरम्यान, नुकतेच संगमनेर व त्यापाठोपाठ अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी लाच घेताना पकडले गेल्याने अधीक्षक पाटील यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून मुंकुद देशमुख व अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक म्हणून अभय परमार यांची नियुक्ती केली होती.
दोन दिवसापूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक बापूसाहेब देशमुख याला एक हजार रूपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागने अटक केली होती.
यानंतर काल पुन्हा नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने अकोले पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक संतोष वाघ याला 10 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
या दोन्ही लाचेच्या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर लगेचच पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोन्ही पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना नियंत्रण कक्षात आणले आहे.