Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील गावांमध्ये सुरुवातीला पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प राबवून व्यवसाय करणारे मोजकेच व्यावसायिक होते. नंतर या व्यवसायाने गती घेतली. मात्र त्यातील शुद्धता हरविल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सध्या कडक उन्हाचे दिवस असल्याने जारच्या पाण्याला मागणी वाढली आहे. सण समारंभ, पार्या, हॉटेल्स, खासगी कंपन्या, छोट्या मोठ्या व्यावसायिकांद्वारे जारच्या पाण्याला चांगली मागणी असल्याने विक्रेत्यांना चांगले दिवस आले आहेत.
इतर मान्यता प्राप्त कंपन्यांपेक्षा स्वस्त दराने हे जार उपलब्ध होत असल्याने ग्राहकही ते खरेदी करत आहेत, परंतु या पाण्याच्या शद्धतेचे काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बहुतांश लग्न समारंभ व इतर समारंभात पिण्यासाठी थंड पाण्याचे जार आणले जातात. तप्त उन्हात पाणी थंड लागते म्हणून लोक ते पाणी पितात मात्र या पाण्या च्या शुद्धतेची हमी काय? याचा कोणताही विचार होताना दिसत नाही अलिकडे अनेक व्यवसायिक थंड पाण्याचे जार विकतात.
ते पाणी शुद्ध असल्याचे सांगतात मात्र त्याची शुद्धता तपासण्यासाठी यंत्रणा नाही. २० लिटर पाण्याचे जार तीस रुपयांना मिळतात उन्हाळ्यात या व्यवसायाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. आठ दहा रुपयांना मिळणारी पाण्याची बॉटल चक्क वीस रुपयांना विकली जाते.
शुद्ध पाणी म्हणून प्रवासात इतर पाणी न पिता लोक आवडीने थंड पाण्याची बाटली घेऊन तहान भागवतात. जारचे पाणी किती शुद्ध आहे याबाबत कोणालाच काहीच माहिती नसते. दर्जेदार व शुद्ध पाणी म्हणून या पाण्याचा पिण्यास वापर होत आहे, परंतु या जारच्या पाण्याचे शुद्धीकरण तपासणार कोण ? याकडे कोणाचे लक्ष नाही.