कोपरगावचा विकास विरोधकांना पाहवत नाही : आ. काळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : मागील चार वर्षात पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्याबरोबरच कोपरगाव शहराचा झालेला विकास कोपरगाव शहरातील सुन जनता पाहत आहे. जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून कोपरगाव शहराची धुळगाव ओळख पुसण्यात यशस्वी झालो आहे.

त्यामुळे शहरातील नागरिक समाधानी आहेत. याचे विरोधकांना दुःख होत असून कोपरगाव शहराचा झालेला विकास विरोधकांना बघवत नाही, अशी टीका आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. त्यामुळे चांगल्या कामात विघ्न आणण्याचे पाप विरोधक करीत असून मुद्दामहून आमच्या वाटेला गेला, तर सोडणार नाही, असा गर्भित इशारा त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

आ. काळे यांच्या प्रयत्नातून कोपरगाव शहराच्या विकासासाठी जिल्हा नियोजन योजनेतून मिळालेल्या ५ कोटी २० लक्ष रुपये निधीतील विविध विकास कामांचे ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आ. काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी कोल्हेंनी देखील या कामाचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना आ. काळे यांनी शहरातील द्वारकानगरी शंकरनगर येथे झालेल्या जाहीर सभेत इशारा दिला आहे. शंकरनगर व द्वारकानगरी यांना जोडणारा पूल बनवणे आदी कामांचे भूमिपूजन आ. काळे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले को, मतदार संघातील जनतेने दाखविलेल्या विश्वासातून तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून विकास कामांसाठी निधी मिळवून देणे हि माझी जबाबदारी आहे. ती जबाबदारी सक्षमपणे पार पाडताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी १३१.२४ कोटी निधी देवून पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे.

त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या विकासासाठी यापूर्वी जवळपास २० कोटी, हद्दवाढ झालेल्या भागाच्या विकासासाठी १० कोटी व जिल्हा नियोजनमधून ५.२० कोटी निधी आणला आहे. त्यामुळे या विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा मला अधिकार असून प्रशासकीय अधिकऱ्यांनी उपस्थित राहणे त्यांचे कर्तव्य आहे.

त्यामध्ये विरोधकांना बोलण्याचा कुठलाही अधिकार नाही. या चार वर्षात आपण केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचली असून विकास काय असतो हे चार वर्षात कोपरगाव शहराचा झालेल्या बदलातून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पुन्हा संधी आपल्याला मिळणार असल्यामुळे त्यांचा जळफळाट सुरु आहे.

हे मी समजू शकतो. परंतु मी मुद्दामहून कुणाच्या वाटेला जात नाही तो माझा स्वभाव नाही. परंतु विनाकारण माझ्या वाटेला कोणी गेला तर सोडणार नाही, असे आ. काळे यांनी ठणकावून सांगितले. यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, बांधकाम अभियंता जनार्दन फुलारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध प्रभागातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.