Ahmednagar News : कोपरगावकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शहराच्या विकासाला भरघोस निधी दिला आहे, परंतु कित्येक कामांचे भूमिपूजन होऊन अद्याप कामे सुरू झालेली नाहीत.
त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अशा ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे विकासकामे थांबायला नकोत, अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना दिली.
कोपरगाव बसस्थानक ते अमरधाम या रस्त्याची दुरवस्था झाल्याने कोपरगावकरांना होत असलेल्या त्रासाची दखल घेऊन आ. काळे यांनी या रस्त्याच्या नुतनीकरणाच्या कामाच्या सूचना नगरपरिषदेला दिल्या होत्या.
त्या रस्त्याचे काम नुकतेच सुरू झाले असून, आ. काळे यांनी त्याची पाहणी केली. या वेळी त्यांनी ठेकेदार व कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. कोपरगाव शहरातील मंजूर असलेली सर्व कामे लवकरात लवकर सुरू करा, अशा सूचना आ. काळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिल्या होत्या,
परंतु कोपरगाव बसस्थानक ते अमरधाम रस्त्याच्या कामाला सबंधित ठेकेदाराने सुरुवात केलेली नव्हती, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. आ. काळे यांनी स्वतः या रस्त्याची पाहणी करून सबंधित ठेकेदारास रस्त्याचे काम पूर्ण करून चांगल्या दर्जाचे काम करावे. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनीही रस्त्याचे काम गुणवत्तापूर्ण होईल, याची काळजी घ्यावी, अशी तंबी दिली.