शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या कर्जमाफीचा रकमेत आढळून येणारी तफावत संशयास्पद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :-सरकारने शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करायचा, म्हणून बँकांना पैसे दिले. मात्र, त्याचा काही बँका गैरफायदा घेऊन उतारा कोरा होऊ देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी गुरूवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला.

शिवाजीनगर येथील सेंट्रल बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेल्या कर्जमाफीचा रकमेत आढळून येणारी तफावत संशयास्पद असून याची चौकशी करण्याची मागणी आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढूस यांनी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्याकडे केली.

निवेदनात म्हटले आहे, अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या केवळ ८५% रकमा शासनाकडून प्राप्त झाल्याचे सांगून पुढील कर्ज देण्यासाठी शेतकऱ्यांकडून व्याज आणि उर्वरित मुद्दलीच्या नावाखाली मोठ्या रकमेची सक्त वसुली बँकेकडून केली जात आहे.

काही शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफीच्या कमी रकमा प्राप्त झाल्याचे सांगून संबंधित शेतकऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय या रकमा बँकेने शासनाला परत पाठवत शेतकऱ्यांना थकबाकीत ठेवले. काही शेतकऱ्यांचे शासनाच्या कर्जमाफी यादीत नाव आले असताना रक्कमच आली नसल्याचे बँकेने सांगितले.

कर्जमाफीची रक्कम कमी आली म्हणून शासनाला पैसे परत पाठवणे, तसेच ८५% रक्कम आली असे सांगून दंड व्याजासह उर्वरित रक्कम भरून घेऊन पुढील कर्ज वितरण करणे संशयास्पद असल्याने चौकशी करून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ढूस यांनी केली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24