file photo

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात अनेक भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जिल्ह्यात 97 महसूल मंडळे असून त्यातील 58 ठिकाणी 20 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झालेली आहे.

तसेच जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 132.2 टक्के पाऊस झाला आहे. यातच श्रीगोंदा, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात सरासरी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

शेवगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली असून श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीत 107 मि.मी., शेवगाव तालुक्यातील चापडगावात 99 मि.मी. तर श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानमध्ये 96.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.

तालुक्याच्या सरासरीत श्रीगोंदा 65, शेवगाव 64, श्रीरामपूर 56, कर्जत 44, नेवासा 38, पाथर्डी 36, पारनेर 27, राहुरी 26 आणि राहाता 23 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे.

दरम्यान जिल्ह्यात दोन-तीन दिवस उघडीप होती. गुरूवारी आणि शुक्रवारी दिवसभर कडक ऊन होते. मात्र शुक्रवारी रात्री दहानंतर अनेक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरूवात झाली. तसेच आगामी काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.