अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2021 :- विकासासाठीच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन अहमदनगर जिल्हा राज्यात विकासाच्या बाबतीत अव्वल राहील, ग्रामविकास आणि शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्याच्या योजना त्यासाठी साहाय्यभूत ठरतील, असा ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हावासियांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पोलीस परेड मैदानावर झाले.
त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे आदींची यावेळी उपस्थिती होती.
राष्ट्रध्वजास मानवंदना दिल्यानंतर संबोधित करताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, गेले जवळपास वर्षभर आपण कोरोनासारख्या महामारीशी सामना करत आहोत.
कोरोना लसीकरणाच्या माध्यमातून आपण कोरोनाला हरवण्याची लढाई सुरु केली आहे. मात्र, ही लढाई अद्याप संपलेली नाही. त्यामुळे सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि आरोग्य विषयक नियमांचे पालन करावे.
कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना आपण शेतकर्यांना बळ दिले. जिल्ह्यातील २ लाख ८४ हजार ८६८ शेतकऱ्यांना एक हजार ७२७ कोटी रुपये कर्जमुक्तीचा लाभ मिळाला.
मागील खरीप हंगामात शेतक-यांना ३ हजार १२३ कोटी रुपयांचे कर्जवाटप केले. यावर्षी अधिकाधिक आणि वेळेवर कर्ज वाटप करण्याच्या सुचना बँकांना दिल्या आहेत.
अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे बाधित शेतक-यांना २२८ कोटीहून अधिक अनुदान वितरित करण्यात आल्याचे ते म्हणाले.
विकेल ते पिकेल या संकल्पनेनुसार शेतमालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात एकूण एक हजार ४०० ठिकाणी संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार सुरु करण्याचे नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली.