अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर हे राष्ट्रीय स्मारक ठरणार आहे. देशातील कोट्यवधी जनतेच्या भावना या मंदिर निर्माण कार्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. राम मंदिर हा एकात्मतेचा मानबिंदू आहे.
प्रत्येक समाजघटकाचे यासाठी योगदान असले पाहिजे. करोडो देशवासीयांचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होत असल्याच्या भावना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केल्या.
कोल्हार भगवतीपूर येथील श्री भगवतीदेवी मंदिरात अयोध्येतील प्रस्तावित श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी कोल्हार उपखंडातील २८ गावांचा निधी संग्रह अभियानाचा शुभारंभ झाला.
याप्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. उद्धव महाराज मंडलिक म्हणाले, राम मंदिर निर्माणकार्य हा विषय जाती-धर्मापलीकडचा असून हा श्रद्धेचा विषय आहे.
एकमेकांच्या विचारधारा भिन्न असू शकतात. मात्र, भारतीय परंपरेनुसार रामकार्यासाठी सर्व एकत्रितपणे काम करतील. भक्तीभावातून बंधुभाव निर्माण होतो.
समाजातील सर्व घटकांचा रामसेवेच्या सत्कार्यात सहभाग व्हावा. प्रभू श्रीराम लंकेत जाताना वानरसेनेने सेतू बांधला, त्याप्रमाणे प्रत्येकाने अयोध्येतील राम मंदिर निर्माणकार्यात खारूताईचा वाटा उचलावा, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
यावेळी उद्योजक अजित कुंकूलोळ यांनी एक लाख रुपये, अॅड. सुरेंद्र खर्डे यांनी ५१ हजार रुपये, कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टने ५१ हजार रुपये व राजेंद्र कुंकूलोळ यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
कार्यक्रमप्रसंगी १९९०- ९२ सालच्या २२ कारसेवकांना सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिवाजी उदावंत यांनी केले. उपस्थितांचे आभार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर नगर जिल्हासंघचालक भरत निमसे यांनी मानले.