अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :- कृषी सोसायट्यांच्या निवडणुका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने घेतला आहे.
यामुळे नगर जिल्ह्यातील आठ बाजार समित्यांच्या निवडणुकांची प्रक्रिया स्थगित झाली आहे. मागील आठवड्यात औरंगाबाद खंडपीठाने मुदत संपलेल्या विविध कार्यकारी सोसायट्यांची निवडणूक बाजार समितीच्या निवडणुकी आधी घेण्याचे आदेश दिले होते.
नगर जिल्ह्यातील पारनेर, कर्जत, जामखेड आणि कोपरगाव बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम सुरू होता. तर संगमनेर, राहाता, राहुरी आणि शेवगाव तालुक्यातील बाजार समित्याचा मतदार यादी कार्यक्रम सुरू होता.
मात्र, आता खंडपीठाचे आदेश पणन विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम थांबविण्यात आलेला आहे. दरम्यान, जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या 814 आणि 2021 मध्ये मुदत संपलेल्या 436 विविध कार्यकारी सोसायट्या आहेत.
अशा प्रकारे 1 हजार 250 पैकी 175 ते 200 सोसायट्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत अथवा त्यांचा निवडणूक कार्यक्रम होणार आहे.
मात्र, तरी 1 हजारांहून अधिक सोसायट्यांची मुदत संपलेली असून त्यांच्या निवडणूका झाल्यानंतरच बाजार समित्यांच्या निवडणूका होणार आहेत.
निवडणूक होणार्या सोसायट्या जामखेड 43, राहुरी 100, शेवगाव 70, श्रीरामपूर 65, संगमनेर 121, अकोले 78 आणि कोपरगाव 102 , राहाता 66, कर्जत 61, पाथर्डी 78, श्रीगोंदा 160, पारनेर 97, नेवासा 119, नगर 90 अशा आहेत.