अहमदनगर बातम्या

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार ! ‘या’ तालुक्यातील 69 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक, 97 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Gram Panchayat Election : येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका रंगणार आहेत. यामुळे संपूर्ण देशात राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले आहे. विशेष म्हणजे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यात की आपल्या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

ती म्हणजे जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा थरार रंगणार आहे. परिणामी, येत्या काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळले जाण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील 69 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जानेवारी ते जून 2024 मध्ये संपणार आहे. यामुळे या ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे.

एवढेच नाही तर जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींमधील 147 जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी लवकरच मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाली की मग राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे.

खरे तर जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ या वर्षाअखेरपर्यंत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत शाखेकडून संबंधित कार्यकाळ संपत असलेल्या ग्रामपंचायतीची नवीन प्रभाग रचना, आरक्षण, मतदार यादी अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

मात्र पहिल्या टप्प्यात 69 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडतील अशी माहिती समोर येत आहे.
या तालुक्यातील 69 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडणार एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील नेवासा तालुक्याच्या 25,कर्जत तालुक्याच्या 18, पाथर्डी तालुक्याच्या 4, शेवगाव तालुक्याच्या 6, अकोले, श्रीरामपूर, श्रीगोंदे आणि राहुरी तालुक्याच्या प्रत्येकी 2, नगर, पारनेर, संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी 1, कोपरगाव, जामखेडमधील प्रत्येकी तीन या ग्राम पंचायतीमध्ये आगामी काही महिन्यात निवडणुकांचा थरार रंगणार आहे.

याशिवाय जिल्ह्यातील 97 ग्रामपंचायतींमधील मृत्यू झालेले सदस्य, नियमांच्या उल्लंघणामुळे अपात्र ठरलेले सदस्य आणि काही इतर कारणांमुळे राजीनामा दिलेले सदस्य यांच्या रिक्त झालेल्या 147 जागांसाठी पोटनिवडणूक सुद्धा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू झाली आहे. एकंदरीत लोकसभा, विधानसभा आणि आगामी ग्रामपंचायत निवडणुका यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात जिल्ह्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Ahmednagarlive24 Office