अहमदनगर Live24 टीम, 19 ऑक्टोबर 2021 :- केंद्र सरकारने कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना देऊ केलेली 50 हजार रुपयांची मदत तटपुंजी असून, कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून भरीव आर्थिक मदत मिळण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करुन,
सदर प्रश्न मार्गी लावून सर्वसामान्यांना आधार देण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, शहर उपाध्यक्ष शाहनवाझ शेख, सचिव सुफियान शेख, सुमित कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कोरोना महामारीच्या काळात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारने उत्तम काम केले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना वेळोवेळी दिलासा मिळाला. अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात कोरोना काळात रात्रंदिवस काम करून आमदार संग्राम जगताप यांनी मोठा आधार दिला.
गरजूंना विविध प्रकारची मदत देऊन या महामारीतून सावरण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला केंद्र सरकारने 50 हजार रुपयाची मदत देण्याची घोषणा केली असून, याला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
तर मदत निधीसाठी (रिलिफ फंड) अर्ज केल्याच्या 30 दिवसाच्या आत रक्कम देण्याचे निर्देश दिले आहे. कोरोनाने महाराष्ट्रात अनेक मृत्यूमुखी पडले. यामध्ये घरातील अनेक कर्ते पुरुष मयत झाल्याने त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. कुटुंबाने आपल्या संसाराचा आधार गमावला आहे.
अन्य मदतीतून त्यांचे हे नुकसान भरून येणारे नाही. मात्र राज्य सरकारने त्यांना भरीव आर्थिक मदत दिल्यास त्यांच्या कुटुंबीयांना आधार मिळणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
केंद्र सरकारने कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये देण्याची मदत जाहीर केली असली तरी ती पुरेशी नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना स्वतंत्र आणि प्रत्यक्ष मदत मिळण्याची गरज आहे.
आमदार या नात्याने विधानसभेत आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करून कोरोनामुळे मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्याइतपत राज्य सरकारकडून आर्थिक मदत मंजुर करून घेण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात सदर प्रश्न उपस्थित करुन सर्वसामान्यांना आधार देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.