ZP School Ahmednagar : जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दरवर्षी मे महिन्यानंतर पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळते. परंतु, यंदा ३१ मार्च अखेर पहिलेचे प्रवेश निश्चित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
राज्य परीक्षा परिषदेमार्फत पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पहिलीपासूनच सुरू करण्याच्या उद्देशाने गुणवत्ता वाढीसाठी पहिलीच्या मुलांचे वर्ग एप्रिल महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५६९ शाळा असून, या शाळांमध्ये सुमारे २ लाख ६ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राज्य परीक्षा परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी जिल्हाशिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी आगामी २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेच्या नियोजनाची माहिती दिली.
यावेळी उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, लेखा अधिकारी रमेश कासार, विस्तार अधिकारी भाऊसाहेब साठे, जयश्री कार्ले, विलास साठे, भाऊसाहेब काळे, सुनील शिंदे, राजू शेलार, अश्फाक शेख आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेतून परिपूर्ण विद्यार्थी घडतात. त्यासाठी क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक गुणवत्ता या सर्वच बाबतीत अग्रेसर करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून शिक्षकांच्या पदोन्नतीचा एक हजाराचा टप्पा ओलांडला आहे.
मिशन आपुलकीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांना २६ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. यावर्षी शिष्यवृत्तीसाठी तिसरी, चौथी पासूनच सुरुवात करण्यात आलेली आहे. तसेच ३१ मार्चपूर्वीच इयत्ता पहिलीचे प्रवेशनिश्चित केले जातील.
हे प्रवेश होताच, १ एप्रिल पासून वर्ग सुरू करण्यात येणार आहेत, असे स्पष्ट केले. पाटील म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसह गुणवत्तावाढीसाठी आम्ही ३१ मार्चपूर्वी प्रवेश निश्चित करून त्यांचे वर्ग घेणार आहोत. याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या आहेत, असे सांगितले.
केंद्र तालुकास्तरावरील सांस्कृतिक स्पर्धामधून उत्कृष्ट ठरलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. यात पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दोन्ही गटांचे प्रत्येकी चौदा असे एकूण २८ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत.