अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :-ग्रामपंचायत निवडणुकीत कर्जत तालुक्यात भाजपाच्या अनेक जागा आल्या असताना त्या जागांवर आमदार दावा सांगत आहे. आजपर्यंत कोणताही लोकप्रतिनिधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत लक्ष घालत नसत.
मात्र, यांनी सर्व बाबी गुंडाळून ठेवल्या आहेत, अशी जोरदार टीका माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत येथे पत्रकार परिषदेत केली. तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या.
बिनविरोध निवडणूक झालेली राक्षसवाडी खुर्द ग्रामपंचायत भाजपाच्या अधिपत्याखाली आहे. तर उर्वरित ५५ ग्रामपंचायतींमधील ५०४ सदस्यांपैकी २३८ सदस्य भाजपाचे निवडून आले आहेत,
त्यामुळे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्याचा केलेला दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या वेळी केला.
प्रा. शिंदे म्हणाले, वास्तविक आता निकाल स्पष्ट झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून, तालुक्यातील २८ ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व आहे.
मात्र, आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यातील ८० टक्के ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीच्या ताब्यात आल्याचा दावा केला असून, हा खोटा व निराधार असून, आम्ही सर्व माहिती घेऊनच बोलत आहोत.