Ahmednagar News :
सध्या अगदी गावातील लहान मोठ्या कामात देखील राजकारण घुसले आहे. त्याचा अनेकदा विकासकामे करताना फटका बसत असतो. या राजकीय हेवे दाव्यात सर्वसामान्यांचे प्रश्न मात्र मागे राहतात. अशीच विविध विकास कामांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत गायरान जमीन बाजार समितीला देण्याच्या मुद्द्यावरून आजी माजी सरपंच व सभापती हे एकमेकांशी भिडले हि घटना श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव ग्रामपंचायतची कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
या ग्रामसभेत श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच एकर गायरान जमीन देण्याच्या मुद्यावरून माजी सरपंच व उपसभापती बाळासाहेब नलगे व लोकनियुक्त सरपंच व माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या अचानक झालेल्या प्रकारामुळे मात्र या ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांना मात्र काय चालले आहे याबाबत समजत नसल्याने काही काळ चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.
ग्रामसभेत माजी सरपंच बाळासाहेब नलगे यांनी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीस पाच वर्षापूर्वी दोन एकर जागा उपलब्ध करून दिली असतानाही कोळगावच्या सरपंच व ग्रामसेवकाने जागेचा प्रस्ताव नाकारून मागील बैठकीत गायरान जमिनीचा नवीन पाच एकर जागेचा प्रस्ताव मंजुरीसाठी प्रशासनाकडे पाठविला.
त्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला. तसेच सदर गायरान जमीन शासनाला व्यापारी कामासाठी देता येत नसल्याबद्दल आक्षेप घेतला. त्यावर सरपंच पुरुषोत्तम लगड यांनी प्रस्ताव पाठविण्यात आला असून, हा प्रस्ताव नामंजूर झाला, तर मान्य करू, असे उत्तर दिले.
तसेच यापूर्वी बाळासाहेब नलगे यांनी वर्ग २ जमिनीवर गरीब लोकांची घरकुले स्वतःच्या जागेत कशी बसवली, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळ वादावादी झाली. अखेर ग्रामसेवक कवडे यांनी पूर्णपणे माहिती घेऊनच प्रस्ताव सादर केल्याची माहिती दिली.