अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- चौघांनी माय-लेकास मारहाण केली व घरात कोंडून घेतले. मारहाणीत शर्मीला दीपककुमार मेट्या (वय 40) व त्यांचा मुलगा अंकुशकुमार दीपककुमार मेट्या (रा. हरीमळा, दरेवाडी) हे माय-लेक जखमी झाले आहेत.
दरेवाडी (ता. नगर) येथील कृष्णा विहार, हरीमळा येथे ही घटना घडली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
सोहम विक्रम दिवटे, सोहम दिवटे याची आई (नाव माहिती नाही रा. हरीमळा, दरेवाडी), सोहम दिवटे याच्या आईचा भाऊ आणि वडिल (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
जखमी शर्मीला मेट्या यांनी फिर्याद दिली आहे. अंकुशकुमार घरी येत असताना सोहम दिवटे याने त्याला सायकलचा धक्का मारून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
सोहमची आईने फिर्यादी शर्मीला यांच्या गळ्याला धरून मारहाण केली. तसेच सोहमच्या आईने अंकुशकुमारला चावा घेतला. फिर्यादी व त्यांचा मुलगा घरात असताना आरोपींनी त्यांना कोंडून घेतले.
त्यानंतर सोहमच्या आईचा भाऊ आणि वडिल यांनी फिर्यादी व त्यांच्या मुलास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डी. व्ही. नागरगोजे हे करीत आहेत.