सक्षम अध्यक्ष दिला, तरच बँकेचे भवितव्य चांगले राहील !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक सुरू आहे.

ही बँक ही काही राजकीय धुडगूस घालण्याची जागा नाही, असे सांगत ज्येष्ठ नेते, माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी संबंधितांचे कान टोचले.

जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना गडाख म्हणाले, जिल्हा बँक प्रगतिपथावर ठेवण्याचा प्रयत्न मोतिभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला.

सगळ्या ग्रामीण भागाचे अर्थकारण, साखर कारखाने, सेवा सोसायट्या जिल्हा बँकेवर पूर्णत: अवलंबून आहेत. गेल्या तीन वर्षांत जिल्हा बँकेवर बेकायदेशीर नोकरभरतीसह अनेक आरोप झाले.

जवळ जवळ शंभर कोटी रुपये तनपुरे साखर कारखान्याकडे थकलेले असून ते वसूल होतील की नाही हे माहीत नाही. अनुउत्पादित कर्जाचे (एनपीए) प्रमाण खूप वाढले आहे, ही चिंताजनक बाब आहे.

बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. अशा अवस्थेत बँकेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मंत्री बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेत. मात्र, त्यांचे जिल्हा बँकेकडे लक्ष नाही.

खऱ्या अर्थाने मातृसंस्था व कामधेनू असलेली जिल्हा बँक बुडाली, तर जिल्ह्यातील साखर कारखाने, सेवा सोसायट्या, तसेच हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील.

त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावे. पक्षीय राजकारण विरहीत बँक सांभाळणारे सक्षम उमेदवार द्यावेत. बँक सांभाळणारा सक्षम अध्यक्ष दिला, तरच बँकेचे भवितव्य चांगले राहील, अशी अपेक्षा गडाख यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24