सध्या शहरी व ग्रामीण भागात एकीकडे मजूर मिळत नसतानाच दुसरीकडे अनेक तरुण कोणतेही काम न करता दिवसभर मोबाईलवर व्यस्त राहत असल्याचे चित्र दिसत असून, त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. युवा वर्ग दिवसभर मोबाईलमध्ये गुंतल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सुशिक्षित तरुणांना आपले गाव, कुटुंब, नातेवाईक सोडून नाईलाजाने नोकरीसाठी पुणे, मुंबई व इतर महानगरात जावे लागते, ग्रामीण भागातील युवकांच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज असताना तसे प्रयत्न होताना दिसत नाही, नेमका दोष कोणाला द्यायचा ? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
चांगले शिक्षण व बेरोजगारी या मुद्याकडे आजपावेतो गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. दर्जेदार शाळा असताना शिक्षकांचा प्रश्न भेडसावत असून, उच्च शिक्षण घेण्याची सोय ग्रामीण भागात नाहीत.
याबरोबरच उद्योगधंद्यांची कमतरता भेडसावत आहे. हा प्रश्न आजही तितकाच गंभीर आहे. विकासाच्या नावावर केवळ शासकीय इमारती, रस्ते, नाला, पुल
झाले हे तर महत्वाचे प्रश्न आहेतच. परंतु त्यापेक्षा तरुण वर्गाला रोजगार मिळणेही तितकेच महत्वाचे आहे.
औद्योगीक वसाहतीमध्ये बाहेरच्या राज्यातल्या तरुणांना प्राधान्य दिले जाते. स्थानिक तरुणांना डावलले जाते. त्यामुळे तरुण बेरोजगार राहत आहेत. क्षमता असूनही तरुणांना गाव सोडून नोकरीसाठी वणवण भटकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कारण इथे उपलब्धता असूनही संधी दिली जात नाही.
याला येथील सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे दुर्दैवच म्हणावे लागेल. तरुण दिवसभर मोबाईलवर गुंतुन राहत असल्यामुळे त्यांना बेरोजगार असल्याचा विसर पडत आहे. आजचे विज्ञान व तंत्र ज्ञानाचे युग असून, यासाठी इंटरनेट ही आवश्यक बाब झाली आहे;
परंतु यातील चांगल्या बाबी न घेता तरुण सोशल मीडियाच्या विळख्यात अडकता आहे, विद्यार्थी व तरुण दिवसभर मोबाईलवर नेट वापरत असल्यामुळे ते बेरोजगार असल्याची जाणीवही त्यांना होत नाही.