अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महसूल व वन विभागातील सहायक वन संरक्षक, गट- अ तसेच वनक्षेत्रपाल गट-ब या संवर्गातील 100 पदांसाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा -2019 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
15 सप्टेंबर 2019 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2019 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील वैभव दिघे हा राज्यातून तसेच मागासवर्गीयातून प्रथम क्रमांक मिळवला आहे.
पुणे जिल्ह्यातील पुजा भाऊसाहेब पानसरे ही मुलींमधून प्रथम आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या एकूण 100 पदांपैकी 29 पदं ही सहायक वन संरक्षक, गट अ या प्रकारातील असून 63 पदं ही वनक्षेत्रपाल गट या प्रकारातील आहेत.
उर्वरित पदांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. राज्यसेवा परीक्षेप्रमाणेच महाराष्ट्र वनसेवा परीक्षा ही महत्वाची मानली जाते. वनक्षेत्रपाल पदाकरीता खेळाडूंसाठी आरक्षित 4 पदं आणि अन्य 3 पदांचा निकाल प्रशासकीय कारणास्तव तसेच अन्य एका विद्यार्थ्याच्या निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राखून ठेवण्यात आला आहे.