Ahmednagar News : केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या आयात शुल्काचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, या प्रमुख मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पाथर्डी शहरातील वसंतराव नाईक चौकात शिवसैनिकांकडून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी भाऊसाहेब धस, रामकिसन भिसे, नवनाथ उगलमुगले, चंद्रकांत शेळके, उद्धव दुसंग, दत्तू कोरडे, महादेव शिरसाट, विष्णू केरकळ, भागिनाथ गवळी, बबन शेळके, राजेंद्र खेडकर, विकास दिनकर, अजिनाथ भापकर, रविराज औटी, अजय शेंडगे, राहुल परदेशी, रावसाहेब बर्डे, गौरव एडके, विनायक साप्ते, आजिनाथ गीते, रवींद्र दिनकर, किशोर गाडेकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान दराडे म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकार हे सातत्याने शेतकरीविरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्याची थट्टा करत आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून, त्याच शेतकऱ्याच्या मुळावर हे सरकार उठले आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्याऐवजी त्या मालावर अवाच्या सव्वा आयात शुल्क लावून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करायची एवढाच उद्योग केंद्र सरकार करीत आहे. शेतकऱ्यांवर आसूड उगवणारे केंद्रातील सरकार आहे.
कांद्यावर एवढा मोठा आयात शुल्क लावून केंद्र सरकार काय साध्य करीत आहे, असा सवाल दराडे यांनी करून या आयात शुल्कबाबतचा निर्णय केंद्राने त्वरित मागे घ्यावा अन्यथा शिवसेना ठाकरे गट यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट करत केंद्र सरकारला इशारा दिला आहे. केंद्र सरकारने कांद्यावरचा आयात शुल्काचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, असे दरोड या वेळी म्हणाले.