सध्या उष्णतेचा कहर पाहायला मिळत असून सूर्य अगदी आग ओकत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिह्यात असह्य उष्णता पाहायला मिळत आहे. राज्यात आकाश कोरडे व निरभ्र झाल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे.
२२ शहरांतील पारा मंगळवारी (दि.३०) चाळिशीपार गेला होता. सोलापूरजवळील जेऊरला उच्चांकी ४४.५ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुढील काही दिवस नागरिकांना दिवसा उन्हाचा तर रात्री उकाड्याचा सामना करावा लागणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात रात्रीचा उकाडा अधिक प्रमाणात जाणवणार आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा ४ तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा २ अंशाने वाढण्याचा अंदाज आहे. विदर्भात सरासरी इतके तापमान राहील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासूनच तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अगदी सकाळपासूनच उन्हाच्या तीव्र झळा लागत आहेत. दुपारी रस्त्यावरून फिरताना उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा असे चित्र असल्याने नागरिक सध्या दुपारी प्रवास करणे टाळत आहेत.
किमान तापमानही वाढल्याने रात्री देखील उकाडा जाणवत असल्याचे चित्र आहे. दरम्यान वाढत्या तापमानाचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक भागातील नागरिकांना ताप, सर्दी, खोकला आदी आजारांनी ग्रासले असून,
सरकारी व खासगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. नागरिक तापमानातील बदलामुळे, तसेच अधुनमधून हवामानात बदल होत असल्याने सर्दी, ताप, खोकल्यांवरील उपचारासाठी दवाखान्याचे हेलपाटे मारत असल्याचे चित्र आहे.
निवडक शहरांतील मंगळवारचे कमाल तापमान
अकोला ४३.९
सोलापूर ४४
बीड ४२
नाशिक ३९.२
मालेगाव ४३.२
जेऊर ४४.५
अहमदनगर ४१
सांगली ४२.४