अहमदनगर बातम्या

जिल्ह्यातील ‘हे’ विमानतळ झाले पुन्हा सुरू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- राज्यात कोविडच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा महिण्यांपासून बंद असलेले शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळअखेर रविवारी सुरू झाले. स्पाईसजेट कंपनीच्या चेन्नई ते शिर्डी या पहिल्या फ्लाईटचे आगमन झाले.

यामध्ये १७० प्रवाशी होते, असे विमान प्राधिकरणाचे संचालक श्रीवास्तव यांनी सांगितले. नाईट लँडीगचे काम प्रगतीपथावर असून लवकरच ही सेवा सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिर्डी येथील जगप्रसिद्ध साईसमाधी शताब्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आले होते.

दरम्यान दोन वर्षे देशातील वेगवान गतीने झालेले एकमेव शिर्डी विमानतळ ठरले आहे. मागील १८ महिण्यांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ बंद करण्यात आले होते. त्यानंतर चालूवर्षी १७ मार्च २०२१ रोजी पुन्हा सुरू झाले आणि महिण्याभराच्या आतच करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या कारणांमुळे दि. ६ एप्रिल रोजी बंद झाले.

आता काल दि.१० ऑक्टोबर रोजी तब्बल सहा महिन्यानंतर पुन्हा सुरू झाले असून स्पाइसजेटच्या चेन्नई ते शिर्डी विमानाचे दुपारी ३ वाजून ३० मिनिटानी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. १८९ आसन व्यवस्था असलेल्या स्पाइसजेटच्या फ्लाईटमध्ये सहा महिन्यानंतर आलेल्या पहिल्या १७० प्रवाशांनी या संधीचा लाभ घेतला.

यावेळी चेन्नई येथून आलेल्या प्रवाशांनी शिर्डी येथे साईंच्या दर्शनाची अनेक महिन्यानंतर संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला. दि. १२ पासून दिल्ली ते शिर्डी विमानफेरी सुरू होणार असून सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी आगमन होणार आहे. १२ वाजून ५० मिनिटांनी पुन्हा शिर्डी ते दिल्ली उड्डाण होईल.

इंडीगो कंपनीचे दुपारी १ वाजता हैदराबाद ते शिर्डी आगमन असेल व दिल्ली ते शिर्डी १ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी विमानतळावर आगमन होणार आहे. सदरच्या फेऱ्या मंगळवार, गुरूवार, शनिवार हैदराबाद ते शिर्डी तसेच सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवारी शिर्डी ते दिल्ली असे शेड्युल असणार आहे, असे ते म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office