जामखेड तालुक्यातील खर्डा येथील ‘राज्य संरक्षित स्मारक’ असलेल्या ऐतिहासिक निंबाळकर गढीच्या तटबंदी, बुरुज व मुख्य इमारतीची पडझड चालूच असून, या पावसाळ्यात तिच्या अस्तित्वाचा प्रश्नच गंभीरतेने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी येथील इतिहासप्रेमी करत आहेत.
दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या गढीच्या पश्चिमेकडील बुरुज कोसळल्याने या गढीच्या अस्तित्वाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच ही सततची पडझड नजीकच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनादेखील धोकादायक ठरत आहे.
खर्डा येथे मध्यवस्तीत असलेली ही दोन मजली उंच मातीच्या भरावाच्या पायावर असलेली महत्वाची ऐतिहासिक वस्तू असून, त्याची निर्मिती १७४३ साली सुलतानराजे निंबाळकर यांनी खर्थ्यांचा किल्ला बांधला त्याचवेळी केल्याची नोंद इतिहासात मिळते.
भक्कम पाया व चार बुरुजांमध्ये सुरक्षितपणे डौलदार पध्दतीने उभ्या असलेल्या या गढीचे वैशिष्ट्ये म्हणजे नक्षीकाम केलेले भक्कम उंच लाकडी प्रवेशद्वार, बारमाही म्हणजे अगदी दुष्काळातही उंचावर पाणी असणारी बारव (विहिरीचा एक प्रकार) व गढीच्या आत असलेले भुयार. या भुयाराची वैशिष्ट्य असे आहे की, या भुयारीमार्गे थेट शिवपट्टण किल्ल्यावर जाता येते.
गढीच्या आत आल्यावर मध्यभागी पसरलेले प्रशस्त मैदान व त्यासोबत असलेली इमारत आजही सुलतानजी निंबाळकर यांच्या कारकिर्दीची आठवण करुन देते.
रयत शिक्षण संस्थेची खर्डा येथील शाळा अनेक वर्षे याच गढीवर भरत होती; परंतु १९९३ च्या भूकंपानंतर सुरक्षेच्या दृष्टीने हे वर्ग नंतर दुसरीकडे भरविण्यास सुरवात झाली. उंचावर असल्यामुळे या गढीवरुन खर्ड्याचा व आजूबाजूचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो
खर्डा परिसरातील अनेक गावांतील जुन्या पिढ्या याच गढीवर शिकल्या असल्याने अनेकांच्या शालेय जीवनातील सुखद आठवणी इथे आल्यावर जाग्या होतात. गढी भव्य व उंच असल्याने खर्थ्याकडे कुठल्याही दिशेने येताना ती सर्वप्रथम दिसते. गढीला पाहताच मन प्रसन्न होते व तिची सध्याची दुरावस्था पाहून वाईटही वाटते. इथे शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्रत्येक स्नेहसंमेलनात या गढीला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्याची मागणी करण्यात येते.
याचीच दखल घेत आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रयत्नातून निंबाळकर गढी, ओंकारेश्वर शिवमंदिर व निंबाळकर छत्री (समाधी), या तिन्ही वास्तूंना ‘राज्य संरक्षित स्मारक’ चा दर्जा देण्यात आला आहे. ऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपणाऱ्या व त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण व संवर्धनाचा मोठा अनुभव असणाऱ्या दिल्ली येथील शिखा जैन व पुणे येथील अर्चना देशमुख यांनी या गढी परिसराच्या विकासाचा तब्बल साडेसहा कोटींचा आराखडा तयार केला आहे.
यामध्ये या गढीवर ऐतिहासिक वस्तू संग्रहालयही प्रस्तावित आहे. परंतु, पुढे महाविकास आघाडीचे सरकार पडल्याने ही गढी विकासकामांपासून वंचित राहिली. चालू पावसाळ्यातच गढीच्या दुरुस्ती, मजबुतीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा ही वास्तू भविष्यात आपल्या भावी पिढीला केवळ छायाचित्रातच दाखवावी लागेल, अशी भिती खर्डा परिसर तिर्थक्षेत्र व पर्यटन विकास कृती समितीचे अध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी व्यक्त केली आहे.