Ahmednagar News : हॉटेल चालकाशी दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून तरुणांच्या जमावाने हॉटेलची तोडफोड, जाळपोळ करत चालकासह तेथील दोन कामगारांना लाकडी दांडके,
लोखंडी रॉड ने बेदम मारहाण करत एकाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर असलेल्या हॉटेल निवांत येथे सोमवारी (दि.२५) रात्री घडली.
याबाबत हॉटेलचालक राजु मुक्ताजी सुंबे (रा. सोनेवाडी, ता. नगर) यांनी शुक्रवारी (दि. २६) सायंकाळी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी सुंबे यांचे अकोळनेर – सारोळा कासार रस्त्यावर दोन्ही गावांच्या शिवेलगत हॉटेल निवांत नावाचे हॉटेल आहे.
या ठिकाणी रविवारी (दि.२४) मध्यरात्री काही तरुणाचे हॉटेल मधील कामगार व फिर्यादी सुंबे यांच्याशी वाद झाले होते. याचा राग मनात धरून सारोळा कासार गावातील गणेश तुकाराम कडूस, शरद रमेश भोसले, वैभव राजु धामणे, शुभम गुलाब धामणे, राहुल बापू कडूस, शुभम गोरख पुंड, सलीम राजु शेख, राहुल गोरख पुंड, शुभम दत्तात्रय कडूस, आकाश बापू कडूस, विशाल रावसाहेब धामणे,
लखन तुकाराम काळे, वैभव दिलीप कडूस, शुभम दत्तात्रय कडूस (सर्व रा. सारोळा कासार, ता.नगर) यांनी सोमवारी (दि.२५) रात्री हॉटेलवर जावून लाठ्या, काठ्या, लोखंडी गजाने हॉटेल मधील टेबल खुर्चा यांची तोडफोड केली. हॉटेलच्या बाहेर केलेल्या छोट्या छोट्या कोप्यांना आग लावून पेटवून दिले.
तसेच हॉटेल चालक राजु सुंबे, व्यवस्थापक आप्पा किसन पळसकर, आचारी राहुल भिकाजी पाटील यांना काठ्या व लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तर एकाने आचारी राहुल पाटील याला जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात बिअरची बाटली फोडली असल्याचे सुंबे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
या फिर्यादी वरून वरील १४ जणांच्या विरोधात भा. दं.वि. कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत, तसेच यात आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.