अहमदनगर बातम्या

सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल – माजी आ. भानुदास मुरकुटे

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- अशोक कारखान्याच्या निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडीवर मतदार सभासदांनी विश्वास टाकला. येत्या पाच वर्षात सभासदाभिमुख कारभार करुन तसेच कारखान्याला प्रगतीपथावर नेत सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू.

तसेच सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल आणि अशोकला भरभराटीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.

अशोक कारखाना निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडीच्या सर्व 21 उमेदवारांना विजयी केल्याबद्दल मुरकुटे यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावात आभार दौर्‍याचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना मुरकुटे म्हणाले की, निवडणूक प्रचारात आम्ही आमच्या पस्तीस वर्षातील कारभार आणि केलेली विकास कामे याचा लेखाजोखा सभासदांपुढे मांडला.

तसेच भविष्यात कारखाना माध्यमातून कोणती कामे करावयची आहेत, याबाबतही सभासदांना माहिती दिली. विरोधकांचा भर मात्र केवळ टिकाटिपणीवर होता.

त्यांच्याकडे विश्वासार्ह नेतृत्व नव्हते तसेच आमच्यावरील टिकेच्या पलिकडे सांगण्यासारखे काहिच नव्हते. या सगळ्याची तुलना आणि मुल्यमापन करुन सूज्ञ मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला.

आता निवडणुक संपली आहे. सभासदांनी काय तो निवाडा केला आहे. सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्याची जबाबदारी आता आमाची आहे, अशी ग्वाही मुरकुटे यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office