अहमदनगर बातम्या

अत्याचार प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षकांकडून काढून घ्यावा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : तालुक्यातील एका शालेय विद्यार्थीनीच्या अत्याचार प्रकरणाचा तपास घारगाव पोलीस निरिक्षकांकडून काढून घ्यावा, तसेच यापूर्वी अशीच घडलेली घटना मिटविणाऱ्या व्यक्तींना सहआरोपी करुन त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मयत मुलीच्या नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली आहे.

या संदर्भात नातेवाईकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना काल मंगळवारी (दि.२६) निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, आमच्या कुटुंबातील मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर तीने आत्महत्या केली.

या दुर्दैवी घटनेमुळे पंचक्रोशीत गावांमध्ये अद्यापही संवेदनशील वातावरण आहे. यापूर्वीही या भागामध्ये अशा घटना घडल्यानंतरही पोलिसांकडून कारवाई न झाल्यामुळे विद्यार्थीनी व पालकांमध्ये भितीचे वातावरण कायम राहिले आहे.

मुलीच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकाऱ्यांकडून आमच्या कुटुंबियांना झालेला त्रास हा खूप गंभीर होता. त्यामुळे त्यांच्याकडून निर्णायक तपास होईल, याबाबत आम्ही साशंक आहोत. त्यामुळेच त्यांच्याकडून हा तपास काढून घेण्यात यावा. सदर घटनेत सहभागी असलेल्या आरोपींनी यापूर्वीही मुलीची छेडछाड करुन त्रास दिल्याची घटना उघड झाली होती.

मात्र, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनेत हस्तक्षेप करुन पोलिसांपर्यंत ते प्रकरण जावू न देता हे प्रकरण परस्पर मिटविण्याचा प्रयत्न केल्यामुळेच या आरोपींना पुन्हा, असे कृत्य करण्याचे धाडस झाले.

यापूर्वीच त्यांच्यावर कारवाई झाली असती तर नंतरची घटना ही घडली नसती. ही वस्तुस्थिती महिलांनी पोलीस उपअधिक्षक वाकचौरे यांच्या निदर्शनास आणून दिली.

आरोपींकडून पहिल्याही घटनेतील माहिती समोर येवू शकेल आणि आरोपींना पाठबळ देण्याऱ्या व्यक्तींचीही नावे समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई व्हावी. संबंधित आरोपींचा यापूर्वीच्या घटनेत असलेला सहभाग आणि अन्य व्यक्तींनी त्यांना असलेली साथ याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office