पक्षकाराच्या न्यायासाठी न्यायाधीश आले कोर्टाबाहेर….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-  मनातील इच्छाशक्ती कृतीत उतरली की, कर्तव्याचे समाधान मिळते. या उक्तीप्रमाणे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये पक्षकारामधील वाद संपुष्टात आणण्यासाठी आणि सामोपचाराने तडतोड व्हावी, याकरिता एक सकारात्मक पाऊल उचलून अहमदनगर येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश श्रीमती सोनल एस.पाटील यांनी एका वृद्ध असहाय्य महिला पक्षकाराकडे स्वत: जाऊन न्याय दिला.

या विषयी सविस्तर हकीकत अशी की, अहमदनगर जिल्हा न्यायालयात वकिल संघ व विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले होते. येथील चौथे सह दिवाणी न्यायाधीश यांचे न्यायालयात एक दिवाणी दावा प्रलंबित होता.

दरम्यान कुटूंबातीलच वाद असल्याने आपआपसात तडजोड होऊन वाद प्रलंबित होता. दरम्यान कुटूंबातीलच वाद असल्याने आपआपसात तडजोड होऊन वाद विषय संपुष्टात आणावा, अशी दोन्ही पक्षकारांची तयारी झाली. त्यानुसार वादी व प्रतिवादी यांनी परस्पर संमतीने वकिलामार्फत लोक न्यायालयात सदरचे वाद प्रकरण तडजोडीसाठी ठेवले.

हे प्रकरण जिल्हा न्यायालयाच्या इमारतीमधील तिसर्‍या मजल्यावरील पॅनल समोर नेमण्यात आले. तडजोडीचा अर्ज सादर केल्यानंतर अर्जातील कथनाबाबत दोन्ही पक्षकाराची सत्यापन पडताळणी होण्यासाठी आणि खात्री करुन घेण्यासाठी पक्षकाराची उपस्थिती आवश्यक होती.

परंतु सदर दाव्यातील प्रतिवादी असलेली महिला वृद्ध व जिना चढण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम नसल्याने तिला चार चाकी गाडीत बसवून आणलेले आहे, असे वकिलांनी पॅनल समोर सांगितले. पॅनल प्रमुख न्यायमुर्ती सोनल एस.पाटील यांनी हा पेच सोडवण्यासाठी तात्काळ पार्किंगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला

आणि पॅनल सदस्य अ‍ॅड.अरुणा उनवणे-राशिनकर, अ‍ॅड.दीपा झांबरे, उपस्थित असलेलेअ‍ॅड.सुनिल मुंदडा यांच्यासह प्रत्यक्ष पार्किंगमध्ये जाऊन कायद्याप्रमाणे खात्री केली आणि पक्षकाराच्या इच्छेनुसार वाद विषयामध्ये तडजोड करुन दावा निकाली काढला.

अशाप्रकारे लोक न्यायालयाचा मूळ उद्देश सफल व्हावा आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामधील कटूता कमी होऊन तडजोडीच्या माध्यमाने न्याय संस्थेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यासाठी न्यायिक अधिकार्‍यांनी उचित पाऊल उचलून पक्षकाराच्या न्यायासाठी सोयीस्कर भुमिका घेत सामाजिक बांधिलकी जपली अशी चर्चा वकिल वर्गात झाली.

यापूर्वीही एका लोक न्यायालयात फायनान्स कंपनी आणि कर्जदार यांचा वाद मिटवण्यासाठी कर्जदारास पैसे जमवूनही काही रक्कम कमी पडली.

त्यावेळी न्यायाधीश सोनल पाटील यांनी पॅनल प्रमुख असतांना सामाजिक भावनेतून पुढाकार घेऊन तो वाद मिटवला होता. यावेळी अ‍ॅड.डी.एस.घोलप, अ‍ॅड.ए.एस.कोल्हे, पार्किंगमध्ये उपस्थित असलेले इतर वकिल, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस आदि उपस्थित होेते. या घटनेचे विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा न्यायाधिश रेवती देशपांडे यांनी कौतुक केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24