अहमदनगर बातम्या

न्यायाधीशांनी मिटविला बहीण-भावातील वाद ! आणि मुलांनी धरले आई वडीलांचे पाय

Published by
Ahmednagarlive24 Office

आई वडीलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार आहे. याचा आधार घेऊन टाकळी कडेवळीत येथील चंद्रकांत दळवी यांच्या एका बहीणीने श्रीगोंदा न्यायालयात धाव घेतली होती.

बहीण भावाच्या पवित्र नात्यात दुरावा निर्माण होऊ नये, म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी बहीण भावाचे नाते हे संपत्तीच्या तराजुत टाकून मोजता येत नाही असे सांगत समजावले असता बहीणीनेदेखील दोन मिनिटात हक्कसोड पत्रकावर सही केली. भावाने बहीणीचा न्यायालयात साडी चोळी देऊन सन्मान केला.

नुकतीच श्रीगोंदा येथील न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत झाली. या लोकअदालतमध्ये न्यायाधीश मुजीब शेख यांनी बहीण भावातील संपत्ती आणि आई वडील व मुलांमधील वाद न्यायदानाचा चौकटीत राहुन मिटविला आणि नात्यातील ऋणानुबंध जोपसण्यासाठी पंचाची महत्त्वाची भुमिका बजावली.

या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये खटलापूर्व तसेच प्रलंबित ८ हजार ८६१ प्रकरणे ठेवण्यात आली होती. या पैकी ३ हजार ७८३ प्रकरणे निकाली काढून २ कोटी ३३ लाख ११ हजार १५४ रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला.

यावेळी जिल्हा व अति. सत्र न्यायाधीश महेश जाधव, जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख, दिवाणी न्यायाधीश एन.एन. कुलकर्णी, एच.जे. पठाण, सह दिवाणी न्यायाधीश श्रीमती के. ए. काटकर, एन.पी. बाजी, तसेच श्रीगोंदा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. ए.बी. रोडे,

श्रीगोंदा वकील संघाचे उपाध्यक्ष अॅड. डी.एल. बोरुडे, अॅड. बी. एन. काकडे, अॅड. काळाणे, अॅड. बाळासाहेब नागवडे, अॅड.पी.जी. फाटे, अॅड. सुधाकर पवार अॅड. एस.एम.पवार, अॅड. कोळेकर, अॅड.एस.एस. मोटे व इतर सर्व वकिल संघाचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

आणि मुलांनी धरले आई वडीलांचे पाय :- मुल सांभाळत नाहीत म्हणून दत्तात्रय व छबुबाई पवार यांनी दोन मुलांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. हे प्रकरण न्याय प्रविष्ट होण्यापूर्वीच न्यायाधीश मुजीब शेख यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि राजेंद्र व विलास पवार यांनी आई वडीलांचे पाय धरले त्यांना घरी घेऊन गेले.

Ahmednagarlive24 Office