अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2021 :- सरकारने वाळुचे लिलाव केल्याने वाळुचे डंपर आता शहरातील रस्त्यावरून धावणार आहेत. त्यामुळे कोपरगाव शहरातील रस्त्यांची दुरवस्था होणार या काळजीपोटी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी बुधवारी (२७) रोजी सकाळी ११ वाजता शहर सभा बोलावली आहे.
दरम्यान विजय वहाडणे यांनी पत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्यातून वहाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून वाळूउपसा करण्याचा लिलाव झाल्याचे समजते. अधिकृत कोण ठेकेदार आहे, हे माहिती नाही.
अनधिकृत बरीच नावे व पक्ष चर्चेत आहेत. वाळूवाहतूक सुरू झाल्यावर कोपरगाव शहरातून मोठमोठे अवजड डंपर, ट्रक, ट्रॅक्टर वाळू वाहतूक करणार यात शंकाच नाही.
या वाहतुकीमुळे शहरातील- परिसरातील रस्त्यांची आहे त्यापेक्षा जास्त दुरवस्था होणार आहे. अपघातांची संख्याही वाढू शकते. सध्या प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण करण्याचे नियोजन आहे.
कोपरगाव शहरातून वाळूवाहतूक होऊ नये यासाठी मी स्वत: उभे राहून इंदिरा पथ येथे वाळूचे अवजड डंपर अडविले होते. पण वाळूवाल्यांची दहशत असल्याने कुणीच साथ देत नाही, बोलत नाही, विरोध करत नाही.
राजकारणी मंडळीच आश्रयदाते असल्याने त्यावेळी कुणीच बोलले नाही. शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊ नये, खड्डे पडून अपघात होऊ नयेत, प्रदूषण होऊ नये म्हणून ‘कोपरगाव शहरातून वाळू वाहतूक होऊ नये’ याविषयी चर्चा करण्यासाठी कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात बुधवार (२७) जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मिटिंग आयोजित केली आहे.